पीएमपीमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावावर महापालिकेचा ‘यूटर्न’   

पुणे : स्वारगेट एसटी बसस्थानक तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शाळांमधील विद्यार्थिनींची ने-आण करणार्‍या पीएमपीच्या बसमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंदाज पत्रकात तरतूद केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु अद्याप या प्रस्तावाला अद्याप कोणतीही मान्यता मिळालेली नाही. सुरक्षा रक्षकांच्या अपुर्‍या संस्थेमुळे सुरक्षा नेमण्याचा निर्णयावर पालिका प्रशासन युटर्न घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
 
महापालिका सुरक्ष रक्षक कंत्राटी पध्दतीने नेमते. पालिकेचे जून कंत्राट संपले असून नव्याने कंत्राट दिले जाणार आहे, त्यासाठी पालिकेने कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी तब्बल १३९ कोटी ९२ लाख रुपयांची निविदा प्रशासनाने काढली असून प्रक्रिया सुरु केली आहे. हे कंत्राट सुमारे १५०० सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी दिले जाणार आहे.
 
पालिकेला ६५० कंत्राटी सुरक्षा रक्षकांची कायम पदे मान्य आहेत. त्यापैकी केवळ ३५० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे अपुर्‍या मनुष्यबळात सुरक्षा विभाग काम काम करत आहे. पाण्याच्या टाक्या, मैदाने, तसेच उद्यानांमध्ये अपुर्‍या मनुष्यबळाअभावी सुरक्षा रक्षक पुरवणे सुरक्षा विभागाला शक्य होत नाही. त्यात आता पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यींनी सेवा देणार्‍या पीएमपी बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमावे लागणार आहेत. त्यात दरवर्षी सेवानिवृत्त होणार्‍यांची संख्याही मोठी असल्याने हे मनुष्यबळ अपुरे आहे. सुरक्षा रक्षक आपुरे पडत असल्याने सुरक्षा विभागाने ४०० कंत्राटी कर्मचार्‍यांची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्यानंतर पीएमपी बसला सुरक्षा रक्षक देणे शक्य होणार आहे.
 
दरम्यान, पालिकेच्या शहरात १९ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या ‘पीएमपी’ची बस सेवा आहे. या बससेवेतून विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची सेवा दिली जाते. या सेवेदरम्यान मुलींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ४८ बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी स्वारगेट एसटी स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना घडल्याने राजकीय वातावरण तापले होते. पुणे शहर सुरुक्षित शहर म्हणून ओळखले जाते. परंतु याच शहरात आता गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहेत. यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याच स्वारगेट एसटी बस स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते.
 
पालिकेच्या शाळेत बसने येणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पालिकेकडून सुरक्षा रक्षक दिले जाणार आहेत. याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये केली जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शाळा आता काही दिवसात सुरु होणार आहेत. परंतु सध्या महापालिकेकडे सुरक्षा रक्षकांचे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यात ४८ बससाठी महिला सुरक्षा रक्षक नेमायच्या असतील तर त्यासाठी नव्याने कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करावी लागणार आहे, शाळेची वेळ बघून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे.

महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे बळ

१५६५ (कंत्राटी कर्मचारी)
२७५ कायम कर्मचारी  
यातील ६० टक्के पुरुष कर्मचारी, तर महिला ४० टक्के २५ तृतीय पंथीय सुरक्षा रक्षक असून आणखी २५ ची नेमणूक करणार  
आणखी ४०० सुरक्षा रक्षकांसाठी कंत्राटी कर्मचार्‍यांची केली मागणी
 
पालिकेला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट संपले आहे. नव्याने निविदा प्रसिध्द केल्या असून त्याची प्रक्रिया सुरु आहे. अद्याप तरी शाळांमधील विद्यार्थिनींच्या  बसमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. कंत्राटी सुरक्षा रक्षक आल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.
 
- पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.

पीएमपीमधील गैरप्रकारांना बसणार आळा 

पुणे : पीएमपीएमएल बसमध्ये आणि स्थानकांवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी, महिला व मुलींची छेडछाड करणार्‍यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. पुणे पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली २ पोलिस निरीक्षक, एक सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकासहा २२ पोलिस कर्मचार्‍यांचा फौजफाटा नेमला आहे. त्यामुळे, आता बस प्रवासात छेडछाड, अक्षेपार्ह हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहणार्‍या भामट्यांसह चोरट्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 
 
पीएमपीएमएलच्या बसेस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात  आल्या आहेत. पीएमपीकडून ३८१ मार्गावर दररोज २० हजार फेर्‍यांद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. त्यामधून १० लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. दररोजच्या बस संचलनादरम्यान अज्ञात व्यक्तींकडून प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची चोरी, छेडछाड यांसह काही असामाजिक घटकांकडून बीआरटी बसस्थानकांमध्ये आक्षेपार्ह मजकुरांचे लिखाण करणे यांसारख्या घटना घडत आहेत. 
 
महिला प्रवाशांसाठी विशेष बससेवांच्या मार्गात वाढ  
 
पीएमपी प्रशासनाकडून सुरक्षेला प्राधान्य
 
पुणे : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून येत्या गुरूवारपासून महिलांसाठी विशेष बसच्या मार्गात वाढ केली आहे. सध्या शहरातील १४ मार्गावर महिलांसाठी राखीव बस धावत असून यात आता आणखी १९ नवीन मार्गाची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील एकूण ३३ मार्गावर महिलांसाठी विशेष बस धावणार असून महिला प्रवाशांचा प्रवास आणखी सुरक्षित व सुखकर होणार आहे. 
 
सद्य:स्थितीत पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रापर्यंत ३८१ मार्गांवर दररोज बस संचलन होत आहे. त्यापैकी १४ मार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र विशेष बस सेवा सुरू आहे. दैनंदिन प्रवासातील गर्दी, महिला-विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, मौल्यवान दागिन्यांची चोरी, लज्जास्पद वर्तन आणि अनेक गैरप्रकारांबाबत महिला प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांचे स्वतंत्र पथक करण्यात आले असताना पीएमपी प्रशासनाने महिलांसाठी विशेष सेवा देणार्‍या मार्गांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९ नवीन मार्ग निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

नवीन १९ मार्ग निश्चित

कात्रज, अप्पर डेपो, भेकराईनगर, स्वारगेट, निगडी, बाणेर, शेवाळवाडी, हडपसर, चर्‍होली, न. ता. वाडी, भेकराईनगर, भोसरी या आगारांमधून आळंदी, मुक्ताई चौक, धायरी डीएसके, महापालिका भवन, पुणे स्थानक, पिंपळे गुरव, निगडी, लोहगाव, वाघोली, पिंपरी-चिंचवड गांव, हिंजवडी माण फेज तीन या ठिकाणांपर्यंत १९ मार्ग निश्चित केले आहे. सकाळी ९ पासून सायंकाळी साडेसहापर्यंत महिलांच्या विशेष बसचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या फेर्‍यांचे नियोजन करताना उर्वरित मार्गांवरील फेर्‍यांमध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नसल्याचे पीएमपी प्रशासनाने नमूद केले आहे.
 
प्रवाशांची गर्दी आणि महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने महिला विशेष बस सेवेच्या मार्गांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षितता निश्चित होणार आहे. महिलांना सुलभ प्रवास करता येईल. 

दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

 

Related Articles